Author(s): डॉ. वीरा पवन मांडवकर
गोषवारा: पटकथा लेखन एक सर्जनशील प्रक्रिया आहे, जी संवाद, कथानक, आणि दृश्य रचनांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दृश्य कलेला आकार देत असते. पटकथा लेखनाचा इतिहास प्राचीन काळापर्यंत जातो. प्राचीन ग्रीक आणि रोम कलेमध्ये नाटक लेखनाचा पाया रचला गेला होता. आधुनिक स्क्रिप्ट अर्थात संहिता लेखनाचा जन्म 19व्या शतकात झाला, ज्या वेळी चित्रपट उद्योगाची सुरुवात झाली. प्रारंभिक काळात चित्रपटांच्या संवाद आणि कथेची साधी रचना होती. काळानुसार संहिता लेखनात अत्याधिक सुधारणा झाल्या. अमेरिकेतील ‘हॉलीवूड’ मध्ये संहिता लेखनाला एक ठरावीक नियमावली तयार करण्यात आली, ज्यात दृश्य आणि संवाद यांच्या स्थितीचे नीटनेटके वर्णन केले जाते. आधुनिक काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने स्क्रिप्ट लेखनाची दिशा बदलत आहे. आता डिजिटल साधनांचा वापर करून लेखनाचे कार्य अधिक सोपे आणि जलद झाले आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) (AI) आणि विविध सॉफ्टवेअर्सच्या मदतीने लेखकांना संहिता तयार करण्यात मदत मिळत आहे. पटकथा लेखनाचे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराची स्वतःची शैली, नियम आणि वैशिष्ट्ये असतात. पटकथा लेखनामध्ये करिअरच्या संधी निर्माण झाल्या आहेत. काही विशिष्ट कौशल्ये आत्मसात केल्यास रोजगारासाठी पटकथा लेखन हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. पटकथेचे महत्त्व प्राचीन भारतीय अभ्यासकांनी ओळखलेले होते. म्हणूनच भरतमुनींनी नाट्यशास्त्रात पटकथेविषयी सर्वांगीण माहिती दिलेली आहे. नाट्यशास्त्राला ‘नाट्य’ (नाटक) आणि ‘शास्त्र’ (ज्ञान किंवा विज्ञान) ह्या दोन शब्दांचे एकत्रित रूप मानले जाते. त्यामुळे यात नाट्यकलेच्या तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला आहे. एक सकस, दर्जेदार कलाकृती निर्माण होईल या दृष्टीने भरतमुनींनी या ग्रंथात नाट्याविषयी अनेक सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांचा समावेश केलेला आहे. नाटक लेखन हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही, तर ते प्रेक्षकांना विचार करायला लावणारे आणि संस्कार घडवणारे असावे लागते, हाच संदेश नाट्यशास्त्रातून भरतमुनींनी दिलेला आहे.
बीजशब्द: पटकथा, नाट्य, सर्जनशीलता, अभिनय, प्रयोग, ग्रंथ, इतिहास, लेखन, चित्रपट, प्रतिबिंब, सिद्धांत.
DOI:10.61165/sk.publisher.script.writing.2024.44
Download Full Article from below:
पटकथा लेखनाचे कौशल्य आणि भरतमुनींचे नाट्यशास्त्र
Pages:211-219
